About Me

Posts

Search

Sunday, September 16, 2018

भारत मातेस पत्र


प्रिय आई भारत माता,
           पत्रास कारण की तुझ्या अंगाखांद्यावर खेळता खेळता कधी मोठा झालो कळालच नाही. तुझ्या कुशित बाहेर गेल्यावर जाणवते, डोक्यावर जम्मू-काश्मीरचा मुकुट पायाला कन्याकुमारी हे असं मोहक रूप बघितलं की मन कसं भरून येतं. खूप दिवस झाले तुला पत्र लिहिले नाही पण आज शेवटी बसलोय. तुझी तब्येत कशी आहे,  कशी असणार जेव्हा स्वतःचे कुटुंब त्रास देत असेल तर त्याचे काय हाल असतात हे जाणतो प्रत्येकजण.  या सर्वांपासूनच मन मोकळं करण्यासाठी तू रडतेस व त्याचा पुर केरळ पर्यंत पोहोचतो तरीही आम्ही तुझे दुःख नाही समजू शकलो. तरी या स्वार्थी दुनियेत कोणाला वेळ आहे कोणाचे दुःखद जाणण्याचा. स्वतःच्या आईसाठी ही नाही वेळ त्यांच्याकडे. 

          अगं कालच माझ्या आणखी एका बहिणीवर आणि तुझ्या मुलीवर बलात्कार झाला गंं. तिही निर्भया सारखी पडलीयं हॉस्पिटलमध्ये एकांतात, निशब्द हाही प्रकार तुझ्याच मुलांनी म्हणजे माझ्याच भावंडांनी केलाय. मग एक विचार वाटतं तुझी मुलं आताही मेणबत्त्या घेऊन फिरणार का ?  निर्भया प्रकरण तर तू डोळ्यांनी बघितलं त्याक्षणी तुलाही त्या नालायकांचा जीव घ्यावा वाटला असेल. पण तुझे हात बांधले गेले होते प्रेमाच्या दोरखंडाने कारण तीही तुझीच मुलं होती. पण तू आता कठोर बनायला हवं कारण तुझी काही मुलं फार बिघडत चालली ते आज स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही घात करू शकतात म्हणूनच आज असुरक्षित देशांच्या यादीत तुझं नाव येतं. 


         तुला एक सांगायचं राहिलं काल तो माझा मित्र सुरेश नाही, का तो परदेशात गेला सगळ्यांनी सत्कार केला त्याचा. पण मला कळत नाही त्याला तुला सोडून जाताना एवढा आनंद का झाला होता. म्हणूनच न राहून मी त्याला विचारलं,  तर म्हणाला कोण या घाणीत राहणार. रोजची कटकट,दंगे,पगारही कमी मिळतो. आता अलिशान घरामध्ये राहणार. पण त्यालाही हे कळलं नाही कि त्याचा जन्म हि घाणीतच झाला, शिक्षणही घाणीतच झाले आणि कमळ ही याच घाणीत फुलतं माझं कोण  ऐकणार ना. तूच समजाव ना त्याला त्याला सांग ह्याच घणीत ए.पी.जे. अब्दुल कलाम, सुनिता विल्यम, स्वामी विवेकानंद जन्माला आले. आणि ह्याच घाणीतून मोठे झाली. पण तू किती जणांना हे सांगणार आमच्याकडे सुरेश काय एकच आहे. अगं आज नासा 80% भारतीय शास्त्रज्ञांच्या जोरावर जगाला डीवचत आहे. ते तुला दिसतंय, कळतंय, अनुभवतेस पण तू बोलत का नाहीस. अग आई सोड आता तरी तू मुकेपणा. आजवर तुझ्या तोंडावर होणारा दहशतवाद नाही पाहू शकत मी, मुंबईत कसाब गोळ्यांनी माणसे उडवत होता तुही पाहिलस ते तुझ्या निशब्द डोळ्यांनी. उरीची घटनाही डोळ्यांनी पाहिलीस. आजवर घडलेल्या शेकडो घटना शेकडो मृतदेह तू पाहिलीस. मग कधी थांबवणार हे सगळं. तुझ्या त्या डोळ्यातून वाहणारे अश्रूत सुद्धा तुझा मुलांनी प्रदूषण केलय. आई श्वास कोंडतोय आता, नाही बघायचं हे सगळं. थांबव !

            आई आज तुझ्या अंगाखांद्यावर तुझ्याच मुली सुरक्षित नाहीत. बलात्कार होतोय गं त्यांच्यावर दिवसाढवळ्या, आणि त्याला तुझी मुलं मर्दानगी समजतात. सांग त्यांना श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश माझ्याच कुशीत दिला. सत्यवचनी राम माझाच आहे. आणि समजव त्यांना जगाला उपदेश देणारा स्वामी विवेकानंदाला सुद्धा जन्म तुच दिलाय. मग तुम्ही असे का ? 
             आई तुला माहिती सविधानात समानता हा शब्द आहे पण आम्हाला जातींनी उच्च नीच बनवलंय गं. आज त्यांच्या नावाखाली दररोज एकाचा जीव जातो. एवढ्यावरच थांबत नाही तर आम्ही महापुरुषांनाही आमचे ब्रँड ॲम्बेसिडर बनवले. आमच्या संविधानात विचार स्वातंत्र्य दिले पण तुझ्या दाभोळकर, गौरी लंकेश सारख्या मुलांनी त्याचा वापर केल्यास त्यांची हत्या होते. आम्ही देव मानतो, धर्म मानतो त्याच्या नावाखाली दंगली ही करतो पण हिंदूची भगवद्गीता, मुस्लिमांचे कुराण काय धर्म शिकवतो हे कधीच वाचत नाही. ही आमची शोकांतिका आहे. असो....
             पण आहे तुला माहिती आपल्या अर्थव्यवस्थेने सहाव्या स्थानी झेप घेतली. आणि तू आज जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतीयेस. आपणही प्रगत होतोय म्हणजे 'मॉडर्न' होतोय. 
             इकडे सर्व खुशाल आहेत. मीही बरा आहे. आणि हो तुझी काळजी घे, आणि त्या तुझ्या डोकेदुखीच्या गोळ्या सारखे घेऊ नको त्याचे वाईट परिणाम आहेत. मला तुझी खुप आठवण येते. पत्रास उत्तर नक्की दे !  
                                                                                                               तुझा लाडका,
                                                                                                              एक भारत पुत्र


No comments:

Post a Comment

Thank You !