About Me

Posts

Search

Saturday, August 11, 2018

दहशतवाद का ?

दहशतवाद आणि उपाय योजना


     “स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किवा इतरांवर आपले विचार लादण्यासाठी निवडलेला क्रूरतेचा मार्ग म्हणजे दहशतवाद होय.”
     आज जगाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दहशतवाद व तो रोकायचा कसा ? याची कारणे काय ? जेव्हा दहशतवाद एखाद्या देशात मूळ धरतो त्यावेळी तिथे विकासाला वाव मिळत नाही. दहशतवादाचे मुख्य धोरण म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था खीळखीळी करणे. जेव्हा अर्थव्यवस्था कोलमडते तेव्हा देश कोलमडतो. आज ही समस्या एका देशाची न राहता जागतिक रूप घेऊ पाहतेय. जगाला उपदेश करणारा बुध्द हा सुध्दा मानवात जन्मला आणि जगाला हिंसेचे वळण देणारा बगदादी सुध्दा माणसातच जन्मला.मग या दोघात एवढा फरक का ? तर फरक फक्त विचारांचा. आज भारत लष्करावर अर्थव्यवस्थेतील एकुण ७५७३८.९५ कोटी(२०१४-१५) जीडीपी च्या २.५%. लष्करावर एवढा खर्च का ? तर फक्त सुरक्षेसाठी. मग आमची सुरक्षा पोखरणारा महत्वाचा किडा कोण ? तर तो दहशतवाद.
       ज्यावेळी पुण्यातील दोन उच्चशिक्षित तरुण दहशतवादाकडे वळतात तेव्हा हा दहशतवाद नावाचा प्रश्न विचार करायला लावतो. जेव्हा २६/११ ला कसाब नावाचा हिंस्त्र प्राणी मुंबईत शिरतो. त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नव्हती का ? त्याला स्वतःच्या जीवाची काळजी नव्हती का ? हे प्रश्न पुढे आवासून ऊभे राहतात.
       लहानपणी एक कथा ऐकलेली, एकदा एका माकडीनीला व तिच्या नवजात पिल्लाला एका टाकीत ठेवतात. नंतर त्या टाकीत हळूहळू पाणी सोडले. पाणी मांडीला लागले. तेव्हा तिने त्या पिल्लाला आपल्या जवळ घेतले. जेंव्हा पाणी गळयापर्यंत आले तेव्हा तिने त्या पिलाला पोटाशी कवटाळले. पण जेव्हा पाणी वाढून नाकात व तोंडात जाऊ लागले, तेव्हा मात्र त्या माकडीनीने त्या पिल्लाला पायाखाली ठेऊन ती बाहेर आली. नंतर तिने त्या पिल्लाला बाहेर काढले. एकीकडे हे उदाहरण असताना. मग कुटुंबातील प्रेमावर आधारलेल्या या जगातील माणूस प्राणी दहशतवादाकडे वळतो कसा ? जेव्हा हाच माणूस दहशतवादाकडे वळून स्वत: मृत्यूच्या दरीत जातो तेव्हा त्याच्या या भावना कोठे जातात ? तो या सर्व गोष्टीसाठी कसा तयार होतो ? याचा सार्वभौम विचार करायला लावणारा हा प्रश्न.
      एकीकडे माणुसकीचे निखळ प्रत्यय देणारी उदाहरणे तर दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणारी उदाहरणे. जेव्हा ९/११ ला अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन विमाने आदळवण्यात आली. तेव्हा अमेरिकेला येणारी सर्व विमाने रोकण्यात आली. यामध्ये ‘डेल्टा १५’ हे हि विमान होते. हे विमान आपत्कालीन स्थिती मुळे कँनडातील एका छोट्या खेड्यात उतरवण्यात आले. लोकांना याचे कारण समजू शकले नाही. त्याच विमानतळावर अशी अजून ५२ विमाने होती. सगळे मिळून १० हजार प्रवाशी झाले. जेवढी लोकसंख्या गावाची, तेवढेच पाहुणे. पुन्हा जेवणाचा प्रश्न ? तेथील गावकऱ्यांनी सगळ्या शाळा मोकळ्या करून व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आणि तीन दिवस १० हजार पाहुण्यांचा पाहुणचार केला. एकीकडे अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणारा माणूस आणि एकीकडे १० हजार लोकांचा पाहुणचार निसंकोचपणे करणारा माणूस. माणूस एकच फरक हा प्रवृत्तीचा. आज या दहशतवादाच्या जाळ्यात प्रामुख्याने तरुण वर्ग ओढला जातोय. यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे. जेंव्हा मुंबईतील तरुणी म्हणते कि, याकडे मी स्वतःच्या विचाराने वळले आहे. तेंव्हा हा प्रश्न खरच आपल्याला विचार करायला लावतो. अशी कितीतरी दहशतवादाची उदाहरणे आहेत.

         ज्यावेळी एखाद्या गोष्टीच्या मुळावर घाव घातला तर ती पूर्णपणे नष्ट करू शकतो. त्यासाठी दहशतवादाची मुळे शोधणे गरजेचे आहे. आंतराष्ट्रीय नेतृत्व करणारे विवेक बिंद्रा म्हणतात. “थायलंड मधील आदिवासी तोंडावर बारीक काट्या खुपसतात. आपण म्हणू हि जबरदस्ती आहे. पण नाही ते म्हणतात, यामुळे माझा देव मला शुद्ध करतो. हे कशामुळे, तर विश्वास ठेवण्याच्या प्रणाली मुळे (Belief  System).” दहशतवादी लहान लहान मुलांना गोळ्या घालून मारतात, आपण हे नाही करू शकत पण ते कसे काय करतात ? तर फक्त आणि फक्त विश्वास ठेवण्याच्या प्रणाली मुळे (Belief  System). दहशतवादी म्हणतात, “मी हे केल्यावर मला माझा देव त्याच्यापाशी बोलवेल.” Belief System माणसाला काहीही करायला लावते. मंडेला, गांधी, तेरेसा यांच्यात एवढी सहन शक्ती कोठून आली तर Belief  System.
       लहान हत्तीच्या पिल्लाला जेंव्हा त्याचा मालक लोखंडी साखळीने बांधतो तेंव्हा तो ती तोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो ती तोडू शकत नाही. पण तोच हत्ती मोठा झाल्यावर त्याला लहान खुंटीला बांधले तरी तो ती दोरी तोडण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाही. कारण त्याची Belief  System त्याप्रमाणे बनलेली असते. याच System मुळे माणूस बनू हि शकतो व मोडू हि शकतो. याच प्रणाली नुसार माणूस वागत असतो. दहशतवाद्याचा विश्वास दहशतवादी तत्वावर बसलेला असतो. म्हणून त्यांची Belief  System त्यावरच विश्वास ठेवत असते.
       दहशतवादाकडे वळण्याचे मुख्य कारण म्हणजे देव, धर्म, जातीव्यवस्था. जर याचच शिक्षण लहान वयातच चांगलं मिळाले तर मला नाही वाटत कोणाची Belief  System त्याला दहशतवादाकडे वळवेल. शेजारी देश पाकिस्तानातून दहशतवादी हल्ले होतात, परंतु भारतातून दहशतवादाकडे वळणाऱ्या तरुणांची आणि तरुणींची संख्या सुद्धा कमी नाही. मग दुसऱ्यावर विचार करण्यापेक्षा आधी आपला प्रश्न सोडवला पाहिजे. कोणत्याही तरुणाचे दहशदवादी होणे स्वप्न नसते, पण त्याला ते करण्यासाठी परिस्थिती भाग पाडते. पण त्याच्यावर हि परिस्थिती का येते ?
      भारतात शिक्षणावर भला मोठा खर्च केला जातो. मग हि शिक्षण प्रणाली आम्हाला दहशतवादाकडे न वळण्याचे शिक्षण का देऊ शकत नाही. ज्या शाळेत शिक्षक पुस्तक शिकवताना पुस्तकाचे पहिले पान जे राष्ट्राभिमान शिकवते ते कधीच शिकवत नाहीत. मग त्या मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती कशी काय जागृत होणार. याला काही प्रमाणात शिक्षण प्रणाली सुध्दा कारणीभूत आहे. याचा विचार करणे गरजेचे आहे.  जेंव्हा ‘अरुंधती रॉय’ नावाची स्त्री नक्षलवादी जंगलात त्याच्या सोबत राहते तेंव्हा त्यांची क्रूरता कोठे जाते. आपल्या देशाच्या समस्या वेगळ्या आहेत. पण आपण उपाय वेगळे करतो.
      संविधानाने जरी आपल्याला ‘धर्मस्वातंत्र्य’ दिले असले तरी सुद्धा आपल्याला न विचारता जन्मल्यावरच धर्म चिटकवला जातो. निवडणुकीचा अधिकार १८ वर्षानंतर, तर मग धर्म १८ वर्षानंतर का निवडला जात नाही. असे अनेक विरोधाभास आपल्या देशात आहेत. आज च्या  स्थितीत धर्म हा गाभ्याचा विषय बनतोय व हाच विषय  दहशतवादाला हि मोठ्या अंशी कारणीभूत आहे. ज्या वयात बुध्द राजविलास सोडून जगाला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी बाहेर पडले त्या वयात आजचा तरुण दहशतवादाकडे वळतोय. ज्या ठिकाणी बुध्द हे ‘अहिंसा परमो धर्मः’ ची शिकवण देतात. जैन धर्म ‘सुक्ष्म किड्यांचा’ विचार करायला लावतो. अल्ला ‘अहिंसा’ शिकवतो. भगवतगीता ‘न्याय’ शिकवते. मग  धर्मावर उभारणाऱ्या दहशतवादी संघटना कोणत्या पायावर उभ्या राहतात ? तर तरुणांना फसवून आपले दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी त्यांना चुकीचा धर्म शिकवला जातो. “दहशतवाद केला तर तो देवांना प्रिय होतो व आपला धर्म हेच सांगतो.” मग त्या साठी तो तरुण काहीही करायला तयार होतो. प्रथम आपल्याला धर्म हि संकल्पना शिकली पाहिजे व शिकवली पाहिजे. माणूस म्हणून आपण काय आहोत व काय करू शकतो याची जाणीव करून दिली पाहिजे.
          दहशतवादाकडे कौटुंबिक दृष्टीने पहिले तर याला आजची कुटुंब व्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे. बुध्द पृथ्वीवर मानवाला निर्वाणाचा मार्ग शिकवण्यासाठी आले. पण जेंव्हा ते संसार विलासात रमले तेंव्हा मात्र देवांना प्रश्न पडला कि, यांना यातुन बाहेर कसे काढायचे. एके दिवशी ते राजमहालातून बाहेर पडले तेंव्हा मृतयात्रा पाहून त्यांना नश्वर जीवनाचा आभास होऊन ते जगाला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी राजमहालातून बाहेर पडले. याचप्रमाणे या विलासी बनत चाललेल्या जगात जेंव्हा आजी-आजोबा वृद्धाश्रमात जातात. तेंव्हा संस्काराची कमी जाणवू लागते, आणि मुले दहशतवादासारख्या चुकीच्या रस्त्यावर घसरतात. मराठीत एक म्हण आहे ‘पुढच्याच ठेच मागचा शहाणा’ पण आज ठेच लागलेली माणसे कुठंतरी हरवत चाललेत म्हणून आजच्या तरुण पिढीला पुन्हा पुन्हा ठेच खावी लागती आहे.            
        ज्या देशात गांधी जन्मले त्याच देशात आज दहशतवाद शिरणे हि मोठी शोकांतिका आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मावर विचार करायला लावणे हि काळाची गरज आहे. एक दहशतवादी मारला म्हणून दहशदवाद मरत नाही, तर त्यांच्या वाईट विचारांना मारणं गरजेचं आहे किंवा ते वाईट विचार निर्माणच होऊ न देण याकडे लक्ष ठेवणे गरजेचं आहे.
             
                                -  शुभम यादव.
                                     
  


1 comment:

Thank You !